Total Pageviews

Wednesday, April 6, 2011

ताडोबा सफारी

मित्राच्या लग्नानिमित्ताने नागपुरला जाण्याचा योग आला, नागपुर म्ह्टले कि ताडोबा आलेच, ते कोण चुकविणार, लगेचच ताडोबाला जाण्याचे ठरले.
आम्ही डिसेंबर २०१० रोजी पहाटे :५० च्या पुणे-नागपुर विमानाने सकाळी :०० वाजता नागपुरास पोहोचलो, लगेचच नागपुर बस स्थानक गाठले. विमानतळापासुन बस स्थानक साधारणतः कि.मी आहे. बस स्थानकाच्या बाहेरच नागपुर-चंद्रपुर खाजगी गाड्या निघण्याच्या तयारीतच उभ्या होत्या, त्यामुळे नाश्त्याला फाटा देऊन चंद्रपुरला जाणारी गाडी पकडली नागपुर-चंद्रपुर अंतर १५० कि.मी आहे, ११:०० वाजता आम्ही चंद्रपुरात दाखल झालो.
तेथुन लगेच खाजगी तवेरा गाडी बुक केली ताडोबाला जाण्यासाठी. चंद्रपुर्-ताडोबा साधारणपणे ३० कि.मी आहे. एव्हाना सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते म्हणुन आधी जेवण करण्याचा निर्णय झाला.
आता ड्रायव्हर बरोबर चांगली ओळख झाली आसल्याने ताडोबाची आधिक माहिती मिळवायला सुरवात केली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ताडोबा मधे सफारी चे आगोदर बुकिंग करावे लागते, आणि ते बुकिंग चन्द्रपुर मधे होते. ही गोष्ट आमच्या साठी नवीन होती, आमच्या माहिती प्रमाणे थेट ताडोबा गेट वरुनच सफारी चे बुकिंग होते, असे समजले होते. त्यातच प्रत्येक गेट वरुन सफारी साठी ठराविक गाड्यांनाच प्रवेश दिला जातो हे माहित असल्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले. आता एव्हढ्या लांब येउन सफारी मिळणार कि नाही ह्याची खात्री नव्हती.
बाकी सर्वांना हॉटेलात सोडुन आम्ही मित्र आणि ड्रायव्हर वनाधिकारी कार्यालयात बुकिंग मिळते का ते पाहण्यास निघालो. सुदैवाने ते कार्यालय हॉटेल पासुन जवळच होते. तिथे गेल्यावर समजले की ताडोबा अभयारण्यात फिरण्यासाठी सकाळी :०० ते ११:०० आणि दुपारी :०० ते :४५ अश्या दोन वेळा आहेत. मंगळवारी अभयारण्य बंद असते.
ताडोबा मधे प्रवेश करण्यासाठी खालील प्रमाणे एन्ट्री गेट्स आहेत. कंसात प्रवेश देण्यात येणार्या गाड्यांची संख्या.
खुटवंडा ()
कोलारा ()
नवेगाव ()
मोहार्ली (२०)
झरी ()
पांगडी ()
बोटेझरी ()
मोहार्ली गेट सोडुन बाकी गेट्स आगोदरच फुल्ल असल्याने, मोहार्ली गेट चे दिवसांचे बुकिंग केले.
वनविभाग हा सरकारी खात्याचा भाग असल्याने सुरवातीला अधिकार्यांच्या वर्तणुकीबाबत थोडे टेंशन होते परन्तु, येथील कार्यालयात अत्यंत सुखद अनुभव आला. येथील वनाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांनी खुपच सहकार्य केले, आणि कंटाळता आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे दिली.
जंगल सफारी साठी स्वतःचे वाहन नेता येते, परंतु गाईड कंपल्सरी आहे. पण स्वतःच्या गाडी पेक्षा 'जिप्सी' (open gypsy) हा सर्वोत्तम पर्याय आहे. प्रत्येक सफारी साठी हिचा रेट Rs.1300/- आहे. ह्यामधे माणसे बसु शकतात. जंगल जवळुन अनुभवायचे असेल तर ह्या जिप्सी ला पर्याय नाही.

बुकिंग मिळाल्या मुळे सर्वांचे चेहरे आता खुलले होते, त्यातच भरपेट जेवण पण झाले असल्यामुळे उत्साहाने चंद्रपुर-मोहार्ली प्रवासाला सुरवात केली. हास्य्-विनोदात हा प्रवास केंव्हा संपला हे कळालेच नाही. आम्ही दुपारी :०० च्या सुमारास मोहार्ली च्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या गेस्ट हाउसपाशी पोहोचलो.
ताडोबा अभयारण्य विदर्भातील मोजक्या अभयारण्यांपैकी एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. ताडोबा चे जंगल हे पानगळी वृक्षांच्या प्रवर्गामधे मोडते. ६५० चौ. कि.मी परीसरात पसरलेले हे जंगल वाघांसाठी उत्तम आश्रयस्थान आहे. वाघांव्यतिरीक्त येथे बिबट्या, अस्वल, गवे, रानकुत्रा, चितळ, सांबर, भेकर, नीलगाय, तरस, कोल्हा, मगर इत्यादि ८० प्रकारचे सस्तन प्राणी आणि २८० प्रकारचे पक्षी आढळतात. (साधारणपणे ज्या जंगलात वाघ तसेच रानकुत्रा हे प्राणी आढळतात, ते जंगल परिपुर्ण जंगल मानले जाते)
जंगलाचा प्रदेश मोठा असल्याने वनखात्याने त्याचे भागात विभाजन केले आहे. त्याला रेंज असे म्हणतात, (ताडोबा रेंज, मोहार्ली रेंज आणि कोळसा रेंज)
मोहार्ली रेंज जवळच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे (MTDC) चे अत्यंत सुंदर गेस्ट हाउस आहे. मोहार्ली गावापासुन ते . कि.मीअंतरावर असलेल्या ह्या गेस्ट हाउस चे वैशीष्ट्य म्हणजे ह्याच्या बाजुस तलाव असुन एका बाजुस गावाकडुनयेणारा रस्ता आहे. येथील तलावावर सकाळ संध्याकाळ विविध पक्ष्यांची गर्दी असते
 


गेस्ट हाउसमध्ये खोल्या आधीच आरक्षीत केल्या असल्यामुळे काहीच त्रास झाला नाही. शहरातुन जंगलात आल्याचा अनुभव तेंव्हा आला, जेंव्हा खोलीपाशी पोहोचताक्षणी नागराजाने दर्शन दिले, साहेब खोलीपुढच्या व्हरांड्यातुन शांतपणे सरपटत झाडीत दिसेनासे झाले. ह्या प्रकाराने सर्व जण खुपच excited झालो होतो. आणी आता पुढील दिवसात काय काय अनुभवायला मिळेल ह्याचाच विचार करत होतो.
दिवसभराच्या प्रवासामुळे थकलो असल्याने आम्ही उरलेला दिवस आराम करण्यात घालवला.
दुसर्या दिवशी दुपारची सफारी बुक केली असल्यामुळे सकाळचा वेळ तसा मोकळाच होता, त्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती, पण जंगल सतत खुणावत असल्याने सकाळी :३० वाजताच आम्ही काही उत्साही मंडळी पदभ्रमंतीसाठी बाहेर पडलो. MTDC व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार तलावाजवळच भटकंती करण्याचे ठरले. संपुर्ण तलावाकाठी खुप मोठ्या आकाराचे शंख आढळले, पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे शंख किनार्यालगत येतात, आणि पाणी ओसरल्यावर तिथेच पडुन राहतात.

जवळच एका निष्पर्ण वृक्षावर विविध प्रकारच्या बगळ्यांनी ठाण मांडले होते, समोरच्या हिरवळीवर वेडे राघू सकाळचा नाष्टा करण्यात मग्न होते. गवताच्या पात्यामधे दडलेले किटक फस्त करताना ते मजेशीरपणे इकडे-तिकडे उडत होते.
 
परतीच्या मार्गावर नीलकंठ ह्या अत्यंत सुंदर पक्ष्याने दर्शन दिले. हे गर्द निळ्या रंगाचे पाखरु पंख पसरुन उडताना अत्यंत सुरेख दिसते.
सकाळची भटकंती आटोपुन :३० वाजता परत विश्रामगृहापाशी पोहोचलो, एव्हाना भुका लागल्या होत्या, म्हणुन आधी नाष्टा उरकुन घेतला. आज दुपारी :०० वाजता सफारीला जायचे होते, ही आमच्या ताडोबा ट्रीप मधील पहिली सफारी असल्याने आम्ही सर्व खुप excited होतो. जिप्सी चे बुकींग MTDC मध्ये आल्यावरच केले होते, त्याप्रमाणे बरोबर :३० वाजता जिप्सी MTDC च्या आवारात दाखल झाल्या, आणी बरोबर :०० वाजता आम्ही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्रवेश केला.




 प्रवेश करताक्षणीच गजराजांचे दर्शन झाले, हे पाळीव हत्ती होते, ताडोबा मधे हत्ती वरुन सुद्धा सफारीचा पर्याय आहे. इथे एकुण प्रौढ आणी लहान हत्ती होते.

 
काही अंतरावरच एका चितळांच्या कळपाने लक्ष वेधुन घेतले, प्रौढ आणि हरिण शावके हिरवळीवर चरण्यात मग्न होती, गाडी थांबताक्षणी बावरलेल्या डोळ्यांनी आमचा अंदाज घेत चरणे सोडुन तिथेच थांबुन राहीली.
मोहार्ली रेंजमधे सर्वात मोठा पाण्याचा साठा असणारे ठिकाण म्हणजे तेलिया लेक, येथे बंधारा बांधुन पाणी अडवले आहे, संपुर्ण तलावाच्या कडेचा रस्ता साधारणपणे . ते . कि.मी आहे. पाणवठ्यावर वाघाच्या पाउलाचे ठसे पहायला मिळाले, एकुणच सुरवात तर झकास झाली होती.


इतर पर्यटकांप्रमाणे आम्ही फक्त वाघ पहायला आलो नव्हतो तर एकुणच जंगलाचा एकांत आणि थरार अनुभवण्याची प्रत्येकाचीच इच्छा होती, त्यामुळे ह्या भ्रमंतीत कोणीच जास्त बोलत नव्हतो,उलट जमेल तितके जंगल डोळ्यांनी पिउन घेत होतो. ह्या उलट जेव्हा तळ्यापाशी जिप्सी थांबवली तेंव्हा आमच्या बाजुलाच आजुन एक जिप्सी होती, त्यात आमच्याच वयाची काही तरुण मुले-मुली होती, त्यापैकी एका मुलीने मोठ्या आवाजात गाणी लावुन ठेवली होती, आपल्यामुळे शांततेचा भंग होत आहे ह्याची जरसुद्धा जाणीव त्या तरुणांना नव्हती. त्यांचा उद्धार करण्याचा मोह कसाबसा आवरुन पुढील भ्रमंतीला सुरवात केली.

सफारी संपण्याची वेळ संध्याकाळी :४५ होती, आता जवळपास :१५ वाजत आले होते, आज दिवसभरात १०-१२ वानर, चितळांचे - कळप, सांबर मादी आणि तिचे पिलू, रानडुक्कर, आणि मुंगुस इत्यादि प्राणी दिसले होते, पण अजुन जंगलाच्या राजाचे दर्शन झाले नव्हते, तरीही जंगलाच्या एकुणच वातावरणाने सर्वजण खुशीत होते

एव्हढ्यात आमच्या गाइडला फोन आला कि तळ्याजवळ आत्ताच एक वाघोबा पाण्यात बसले आहेत, आता आम्ही तळ्याच्या बरोबर विरुद्ध बाजुस होतो, तिथुन तळ्यापर्यंत जाण्यास किमान १०-१५ मिनीटे लागणार होती, मनोमन वाघ आजुन बराच वेळ पाण्यात बसुन राहु दे, अशी प्रार्थना करीत आम्ही तळ्याकडे मोर्चा वळवला.
तळ्याच्या बाजुने जाणारा रस्ता वळणावळणाचा आहे, त्या रस्त्यावर आलो, - वळणे ओलांडली असतील तोच, समोरच्या वळणापलीकडे साधारणपणे कि.मी अंतरावर बर्याच जिप्सी उभ्या असलेल्या दिसल्या, आम्ही तिथे पोहोचेस्तोवर :३० वाजले होते, आणि वाघ नुकताच तळ्यातुन पोहत पोहत पलीकडच्या किनार्यावर पोहोचला होता. पलिकडच्या गवतात आम्हाला तो प्रथम दिसला, एव्हढ्या लांबुन सुद्धा तो खुपच विलक्षण दिसत होता, तो रुबाबात पाउले टाकीत जंगलात दिसेनासा झाला. हे सर्व नाट्य अवघ्या २०-२५ मिनीटात घडले.
मिनीटे कोणीच कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, गाइड म्हणाला, तुम्ही खुप भाग्यवान आहात कारण, तुम्हाला पहिल्या सफारीतच वाघ दिसला. बर्याच पर्यटकांना आठवडाभर फिरुन सुद्धा कधी कधी वाघ दिसत नाही.
वाघ पाण्यावर आलेला प्रथम एका जिप्सी मधील पर्यटकांना दिसला, तळ्याच्या बाजुला रस्त्याचे काम चालु होते, तिथे काही मजुर बायका-पुरुष मंडळी काम करत होती, तेव्हा हा वाघ गवतात लपुन त्या बायकांवर उडी मारण्याच्या पवित्र्यामधे दबा धरुन बसला होता. परंतु गाडीच्या आणि पर्यटकांच्या आवाजामुळे त्याने तो नाद सोडला आणि तळ्याच्या पलिकडे चरत असणार्या चितळांच्या कळपाकडे मोर्चा वळवला. आम्हाला ही सर्व हकिकत तेथे रस्त्याच्या कामावर देखरेखीसाठी आलेल्या वनाधिकार्यांनी सांगितली. (वाघ शक्यतो उभ्या असलेल्या माणसांवर हल्ला करत नाही, बसलेल्या माणसावर तो हल्ला करतो, इथे त्या मजुर बायका खाली बसुन रस्त्याचे काम करत होत्या त्यामुळे वाघ हल्ल्याच्या पवित्र्यात दबुन बसला होता.)
वाघाचे हे प्रथम दर्शन खुपच रोमांचकारी होते. थोडी भीती, खुपसा आनंद आणि काहीशी हुरहुर अश्या मनस्थितीतच आम्ही अभयारण्याच्या बाहेर पडलो आणी MTDC चे विश्रामगृह गाठले.
एकुणच आजचा दिवस सर्वांसाठी खुपच अविस्मरणीय ठरला होता, जेवण झाल्यावर कॅंपफायरपाशी सगळे आज दिवसभरातील घटनांबाबतच बोलत होते.दुसर्या दिवशी सकाळीच्या सफारी चे बुकींग केले होते, तेंव्हा आता उद्या अजुन काय पहायला मिळणार ह्या विचारातच कधी झोप लागली ते कळलेच नाही.
सकाळच्या सफारीची वेळ :०० ते ११:०० अशी होती, आज पुन्हा आम्ही मोहर्ली रेंजमधेच फिरणार होतो. पहाटे :१५ वाजता उठुन सर्व आवरुन जिप्सीची वाट पहात तयार होउन थांबलो. बरोबर :०० वाजता आम्ही आमच्या दुसर्या जंगल सफारीला सुरवात केली. डिसेंबर महिना असल्यामुळे अजुन बाहेर अंधारच होता, जंगल नुकतेच जागे होत होते.
आजसुद्धा सर्वप्रथम चितळांच्या कळपानेच सलामी दिली. पहाटेच्या शांत वातावरणात ते शांतपणे हिरवळीवर चरत होते. त्यानंतर दिसले ते मोठे कोळी अर्थात जायंट स्पायडर. झाडावर मोठमोठाली जाळी विणून हे भक्ष्याच्या शोधात निवांत बसुन होते, जिप्सीच्या मार्गावरच ते बर्याचदा इतके खाली आले होते की जिप्सीमधे उभे राहीले असता त्यांच्याशी धडक अटळ होती.

मोहार्ली परीसरात सध्या नर आणि मादी वाघ वास्तव्यास होते, त्यापैकी एका मादीला आणि दुसर्या मादीला पिले होती. लहान पिले असणारी वाघीण हि धोकादायक असते आणि लवकर चिडते. त्यामुळे तिचा वावर असणारा परिसर सध्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाघीण आणी पिले एकत्र पाहण्याचा योग नव्हता,परंतु मातीच्या रस्त्यावरील वाघीण आणि पिलांच्या पावलांचे ठसे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होते.

आज बहुतेक सर्व प्राण्यांनी अघोषित संचारबंदी पुकारली होती की काय नकळे परंतु आज जवळपास - तास उलटुन सुद्धा कोणताच प्राणी दिसण्यास तयार नव्हता. पण म्हणतात ना की 'सब्र का फल मीठा होता है ! ' त्याचाच प्रत्यय आम्हाला पुढे येणार होता.
साधारणतः :०० वाजण्याचा सुमार असावा,आम्ही जंगलातील एका उपरस्त्यावरुन मुख्य रस्यावर आलो, काही अंतर जाताच थोड्या अंतरावर एक जिप्सी आमच्याकडेच तोंड करुन उभी असलेली दिसली, आम्ही पुढे जाण्यास सुरवात करताच त्या जिप्सी मधील गाइडने आम्हाला आहे तिथेच थांबण्याची खुण केली. ह्याचे कारण लगेचच लक्षात आले, आमच्या दोन जिप्सीच्या मधे, सफारी मधे दुर्मिळ पणे दिसणारी - रानकुत्री चक्क रस्त्यावर मजेत बसली होती. रानकुत्रा हा तसा लाजाळु प्राणी आहे, माणसाला तो घाबरतो, पण प्रसंगी - रानकुत्री एका वाघाला सुद्धा लोळवु शकतात, त्यामुळेच वाघ सुद्धा त्यांना सामोरे जायचे टाळतो.



अशी ही रानकुत्री चक्क आमच्या समोर दिसल्याने आमच्यावर आनंदाने वेडे होण्याचीच पाळी आली. रानकुत्री आपली हद्द आखताना झाडावर आणि गवतावर आपल्या मूत्राची धार सोडतात, असे सर्व प्राणी करतात त्यात नवल काही नाही, परंतु रानकुत्र्यांची मुत्र विसर्जनाची पध्दत खरोखर खुप वेगळी असते, मुत्र विसर्जित करताना ते उडी मारतात आणि मागिल दोन्ही पाय एकत्रपणे हवेत उचलुन झाडावर तुतारी सोडतात. ही विलक्षण पध्दत पाहुन खुप अचंबा वाटला.
काही वेळाने त्यांचा हा खेळ थांबला, कारण बाजुच्या झाडीतील कुठल्यातरी गोष्टीने त्यांचे लक्ष वेधुन घेतले होते, आता त्यापैकी रानकुत्री जंगलात जाणार्या एका पाउलवाटेवरुन आत जात होती आणी काही वेळाने तशीच मागे पळत येत होती. हा प्रकार जवळपास १० मिनीटे चालु होता, त्यांच्या ह्या वागण्याचा खुलासा नंतर त्या दुसर्या जिप्सी मधील पर्यटकांनी केला, की पाउलवाटेवरुन जंगलात जाणार्या रस्त्यावरील एका झाडावर एक अस्वल बसले होते, रानकुत्री त्यालाच घाबरून पळत बाहेर येत होती.
आता सफारीची वेळ संपत आली होती, ही आमच्या ताडोबा मुक्कामातील शेवटची सफारी होती, पण अजुन मनाप्रमाणे वाघ बघता आल्याने थोडीशी हुरहुर वाटत होती, आज संध्याकाळी आम्ही नागपुर ला परत जाणार होतो, MTDC चे बुकींग खरे तर दुसर्या दिवशी दुपारपर्यंत होते, पण दुसर्या रेंज मधील सफारीचे बुकींग मिळाल्यामुळे आम्ही आजच गाशा गुंडाळुन नागपुरला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. जंगलातुन बाहेर पडताना अचानकपणे सगळ्यांनीच एक दिवस अजुन जंगलाच्या सान्निध्यात राहण्याची ईच्छा व्यक्त केली, त्यातच गाडी मधील गाइडने आज संध्याकाळी जास्त गाड्यांचे बुकींग नसल्याने संध्याकाळच्या सफारीची तिकिटे मिळवुन देण्याचे आश्वासन दिले, मग एक दिवस थांबण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे मघाशी परत जाण्याच्या कल्पनेने हिरमुसलेले सर्वांचे चेहरे आनंदाने ओसांडुन वाहु लागले.
आता ताडोबामध्ये एक दिवस वाढला होता, आजुन दिवस तरी निसर्गाच्या सान्निध्यात राहता येणार होते, पुढची सफारी कालच्याप्रमाणेच दुपारी :०० वाजता होती, आणि सुदैवाने आम्हाला तिकीटे मिळाली होती. ठरलेल्यावेळी आमच्या तिसर्या सफरीला सुरवात झाली.
व्याघ्रप्रकल्पात प्रवेश करुन आम्ही एनबोडी ह्या पाणवठ्याकडे जाणार्या रस्त्याला वळलो, ह्या रस्त्यावरुन पावसाळ्यात ओढा वाहतो, ओढ्याचे पात्र ओलांडल्यावर थोडा चढ आहे, तो चढुन वर आलो आणी बघतो तर काय, समोरच रस्त्यावर साधारणतः २००-३०० मीटर अंतरावरुन साक्षात एक वाघोबा डुलत डुलत रस्त्यावरुनच चालले होते, आमची गाडी त्यांच्या मागुनच काही अंतर ठेवुन चालली होती, थोड्याच वेळात गाडी चा कानोसा घेत ते बाजुच्या गवतात दिसेनासे झाले, जिथुन वाघ गवतात शिरला होता त्या जागेपाशी पोहोचायला आम्हाला फक्त अर्धा मिनीट लागला असेल, पण तिथे आता वाघाचा कोणताच मागमुस नव्हता.


खेडेगावातील जनमानसात अनेक दंतकथा पसरलेल्या आहेत, जसे की, वाघाकडे काहीतरी दिव्य शक्ती असते तो कोणाचेही रूप घेऊ शकतो, तो कुठुनही गायब होवुन कुठेही प्रकट होवु शकतो. ह्या दंतकथा का पसरल्या असाव्यात ह्याचा आत्ताच घडलेल्या घटनेनी प्रत्यय आला. जंगलाशी एकरुप होणारा मातकट पिवळसर रंग आणि अंगावरील पट्टे ही वाघाला निसर्गतः मिळालेली देणगी आहे, त्यामुळे गवतात तो अगदी -१० फुटांवरुन सुद्धा चटकन ओळखता येत नाही.
ह्या चुटपुटत्या दर्शनानंतर आम्ही एनबोडीच्या पाणवठ्यावरुन - चकरा मारल्या, परंतु काही विशेष पाहण्यास मिळाले नाही.

पाणवठ्यावरुन मुख्य रस्त्यावर आलो, काही अंतर गेल्यावर पुन्हा एकदा वानरांची एक टोळी रस्त्याजवळच्या झाडावर दंगामस्ती करताना आढळली, चितळांचे कळप तर मधुन मधुन दिसत होतेच, अचानक पणे रस्त्याच्या कडेला , रस्त्याजवळच भेकर चरताना दिसले, हा पण अत्यंत लाजाळू आणि भित्रा प्राणी आहे, आम्ही त्याच्यापासुन काही अंतरावर गाडी उभी केली, ते गवत खाण्यात मग्न होते, तुकतुकीत कांतीचे ते भेकर खुपच छान दिसत होते. जरावेळ गवत खाउन ते उडी मारुन जंगलात दिसेनासे झाले.

दरम्यान पुढे असणार्या एका गाडीतील लोकांना वाघ उजवीकडच्या जंगलातुन रस्ता ओलांडुन डावीकडच्या जंगलात जाताना दिसला होता. तो आता नक्की पाणवठ्यावर जाणार असे गाईडचे म्हणणे पडले त्यामुळे आम्ही तात्काळ पाणवठ्याकडे निघालो, ज्या बाजुला वाघ गेला होता तिथेच जंगलात एक रानकोंबडा खुप जोर-जोराने ओरडत होता, हा त्याने वाघ पाहिल्याचा अलार्म कॉल होता.
मुख्य रस्त्यापासुन एनबोडीचा पाणवठा आतल्या अंगाला . कि.मी वर होता, आम्ही त्या जागी जाउन थांबलो. जंगलातील जबरदस्त शांतता आता आम्ही अनुभवत होतो. गाडीतील सर्वजण मेल्याप्रमाणे चिडीचुप बसलो होतो, त्या शांततेचा भंग व्हावा असे कोणालाच वाटत नव्हते. आता फक्त माशांची गुणगुण आणि एकमेकांच्या श्वासाचे आवाज तेव्हढे ऐकु येत होते. जवळपास अर्धा पाउण तास असाच गेल्यावर गाईडच्या व्हायब्रेटर वरील मोबाईल ने शांततेचा भंग केला, फोनवर दुसर्या गाडीतील गाईडने एक वाघ मुख्य रस्त्याजवळ वन्य प्राण्यांसाठी तयार केलेल्या एका पाणवठ्यावर पाणी पीत पाण्यातच बसुन आहे असे सांगितले, आमची वरात पुन्हा एकदा मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ झाली.
दुरुनच पाणवठ्यापाशी आधीच जिप्सी उभ्या असलेल्या दिसल्या, पाणवठ्यावर पोहोचताक्षणी गेले - दिवस जो आटापिटा केला होता त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले, गाड्यांकडे दुर्ल़क्ष करुन वाघोबा शांतपणे पाण्यात बसुन पाणी पिण्यात मग्न होते. वाघाला जंगलाचा राजा का म्हणतात हे त्याच वेळी उमगले, आमच्या उपस्थितीची त्याला अजिबात फिकीर नव्हती, जंगलाचे ते वैभव आम्ही जवळपास -१० मिनीटे शांतपणे निरखीत होतो, सर्वजण जणु कोणीतरी गारुड केल्याप्रमाणे निर्जीव पुतळ्यांसारखे स्तब्ध उभे होते. एव्हाना अंधार पडायला सुरवात झाली होती, सफारीची वेळसुद्धा आता संपत आली होती, एव्हढ्यात एका अति-उत्साही परदेशी पर्यटकाच्या कॅमेर्यातुन फ्लॅश उडाला. वाघाने गुरगुरत गाडीकडे नापसंतीचा एक कटाक्ष टाकला आणि उठुन उभा राहीला, मग कसलीही घाई करता शांतपणे पावले टाकीत जंगलात दिसेनासा झाला.



हा आम्ही पाहीलेला मोहार्ली परिसरातील सर्वात मोठा वाघ होता, त्याची शेपुट दुसर्या वाघाबरोबर झालेल्या झटापटीत वाकडे झालेले होते, त्याच्या बेभरवशीपणामुळे वनकर्मचार्यांनी त्याचे 'येडा अण्णा' असे नामकरण केले होते.
आता परतीचा प्रवास लवकरच सुरु होणार होता, गेले दिवस आम्ही ह्या जंगलाशी अगदी एकरूप झालो होतो, परत जाण्यास मन तयार होत नव्हते, परंतु आता जाणे भागच होते. ह्या दिवसात आम्हाला वाघ, चितळ, सांबर, भेकर, रानकुत्रे, रानडुक्कर, मुंगुस, नीलपंख (इंडियन रोलर), स्वर्गिय नर्तक (पॅराडाइज फ्लायकॅचर), हरीयल (ग्रीन पीजन), मोर, वेडे राघु इत्यादि अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन झाले होते.
पुढील वर्षभरात पुन्हा एकदा ताडोबाला येण्याचे मनोमन ठरवतच ताडोबाचा निरोप घेतला.

7 comments:

  1. भारी लिहिलास रे, पहिलाच ब्लॉग इतका मोठा आणि तोही इतका चांगला. मस्तच

    ReplyDelete
  2. छान लिहिले आहे.
    माहितीबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. hi Yogesh, nice to see your blog... Hope to read ur posts more often. visit my blog http://niftyart.blogspot.com.au/

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. खरच योगेश खुप छान वर्णन केल आहेस तू ताडोबा सफारी च

    ReplyDelete
  6. खरच योगेश खुप छान वर्णन केल आहेस तू ताडोबा सफारी च

    ReplyDelete
  7. खूप छान वर्णन केले आणि मला खूप आवडला.

    ReplyDelete